रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

महिलेसह दोघांना कर्जत पोलिसांकडून अटक

| कर्जत | प्रतिनिधी |

तालुक्यात अपहरण आणि लुटमारीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका 61 वर्षीय वृद्धाला रेल्वे स्टेशनवरून बोलावून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून मारहाण करत सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटण्यात आली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल दयाराम गजघाटे (वय 61, रा. नागपूर) यांना आरोपी आदिती ढोके हिने कर्जत रेल्वे स्टेशन येथे बोलावले होते. त्यानंतर तिचे साथीदार सुशील जाधव व गणेश प्रधान यांच्या मदतीने फिर्यादीचे अपहरण करण्यात आले. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून विविध ठिकाणी फिरवले. त्यानंतर आरोपी आदिती ढोके राहात असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादीला मारहाण करत चॉपरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेत आरोपींनी फिर्यादीकडून दीड तोळ्याची सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या, 15 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा एकूण सुमारे 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपींनी फिर्यादीकडून एटीएम कार्डचा पिन नंबर जबरदस्तीने मिळवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले. याशिवाय क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करत आर्थिक नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 8 मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असून, 9 मार्च रोजी सकाळी 6.30 वाजेपर्यंत फिर्यादीला आरोपींनी डांबून ठेवले होते. या प्रकरणी 10 मार्च रोजी पहाटे 2.03 वाजता कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version