वृद्धेच्या मारेकर्‍याला अटक

| उरण | वार्ताहर |
येथील बोकडविरा गावातील वृद्ध महिला ललिताबाई ठाकूर हिचा खून करुन फरार झालेला आरोपी अमोल सर्जेराव शेलार याला नगर येथून अटक करण्यास उरण पोलीस ठाण्याला यश आले आहे. ललिताबाई ठाकूर या महिलेने आपल्या उदरनिर्वाहासाठी शेजारचीच खोली शेलार या इसमाला भाड्याने दिली होती. त्याने ललिताबाईचा खून करुन याच खोलीला बाहेरून कुलूप लावून तो फरार झाला होता. अमोलचे ललिताबाईशी भांडण झाले होते.या वादातूनच खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचे तपासात समोर आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट,श्‍वानपथक दाखल करुन खून्याचा शोध सुरू केला.तसेच संशयित फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तैनात केली.आरोपी अमोल सर्जेराव शेलार या इसमास पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने नगर येथून अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Exit mobile version