ज्येष्ठांनी समाजप्रबोधन करावे; माजी आ.पंडित पाटील यांचे आवाहन

। पेझारी । वार्ताहर ।

पोयनाड ज्येष्ठ नागरिक संघ हा रायगड जिल्ह्यांतील एक नंबरचा संघ आहे. या संघामध्ये विविध विचारांचे, विविध पक्षाचे आणि विद्वान नागरीक आहेत. ते एकत्रित येऊन अशा वर्धापन दिनातून विविध उपक्रम राबवित आहेत याचा मला अभिमान आहे. यापुढेही त्यांनी समाजामध्ये घडणार्‍या विविध गोष्टींचे जनतेला प्रबोधन करावे, असे आवाहन माजी आ. पंडित पाटील यांनी ज्येष्ठ नागरीक संघाच्या वर्धापनदिनी बोलताना केले.

ज्येष्ठ नागरीक संघाचा 15 वा वर्धापनदिन पोयनाड बाजार येथील संघाच्या कार्यालयासमोरील आवारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी जि.प.सदस्या चित्रा पाटील, सरंपच सुमना पाटील, संजय राऊत, प्रभाकर दांडेकर, अध्यक्ष महादेव पाटील, माजी अध्यक्ष के.आर.पाटील, राजाभाऊ हळदवणेकर, अरूण राऊत, सहसचिव मधुकर राऊत, जयवंत पाटील, नारायण म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रामचंद्र देवजी म्हात्रे, दत्ताराम पाटील, सुरेश पाटील, वनिता पिंगळे, योजना पाटील, चंद्रकांत पाटील आदी. मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक महादेव चांगू पाटील यांनी केले तर स्वागत व ईशस्तवन संघाचे सदस्य मारूतीबुवा व सहकारी यांनी गायले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या 80 दाम्पत्यांचा सपत्निक सत्कार, वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार, त्याचप्रमाणे अनेकांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे 10 वी 12 वी तसेच विविध क्षेत्रांतील प्राविण्य मिळविलेल्या पाल्यांना यांचाही मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गुणगौरव करणेंत आला.
यावेळी सुरूवातीलाच आपल्या भाषणांतून माजी आमदार पंडीत पाटील यांनी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.तसेच पोयनाड ज्येष्ठ नागरीक संघाच्या कामाचे कौतुक करून या संघाच्या पाठीशी आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्‍वासन देत अध्यक्ष महादेव पाटील व सर्व कार्यकारिणी मंडळाचे कौतुक केले.
जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी ज्येष्ठ नागरीक संघ पोयनाड या संघामध्ये बुद्धीमान आणि विविध क्षेत्रातील शासकीय नोकर्‍यांमध्ये अनुभवी असलेल्या व्यक्तींचा संघ आहे. आज जीवन काय आहे याची जाणीव प्रत्येकालाच झाल्याने सर्व एकत्र येण्याचे चांगले काम करीत आहेत.या नागरिकांसाठी माझ्या परीने लवकच अद्ययावत अशी इमारत माझ्या प्रयत्नाने मुख्य रस्त्यावर बांधून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.तर जि.प.सदस्य चित्रा पाटील यांनीही आपले अत्यंत मौलिक शब्दांमध्ये ज्येष्ठ नागरीकांसमोर विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तर अ‍ॅड.आस्वाद पाटील, चित्रा पाटील सुमना पाटील, पंडित पाटील यांनी संघाला रोख स्वरूपात देणगी जाहीर केली.

Exit mobile version