समाजमाध्यमावर निवडणूक फिवर

कार्यकर्त्यांचा डोळ्यात तेल घालून प्रचार

। रायगड । प्रतिनिधी ।

ग्रामीण भागात होर्डिंग, पोस्टर, बॅनर, प्रचारपत्रक तथा घर चलो अभियानाच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत सर्वपक्षीय प्रचारक पोहोचत आहेत. यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीत समाजमाध्यमांचा आक्रमकपणे प्रचारासाठी वापर केला जात आहे. यामुळे प्रत्येकापर्यंत पक्षीय उमेदवाराला पोहोचणे सहज शक्य होत आहे. लोकसभेपेक्षा आताच्या विधानसभा निवडणुकीत हे तंत्र अधिकच प्रभावीपणे वापरले जात आहे. ग्रामीण भागातही समाजमाध्यमांवर निवडणुकीचा फिवर रंगला आहे.

समाजमाध्यम हे आजकाल सर्वांच्याच ओळखीचे झाले आहे. यामुळे निवडणुकीत या आधुनिक तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. काळ बदलला आणि त्यानुसार आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले. साहजिकच प्रचाराचा कालावधी कमी झाला. पारंपरिक प्रचाराची जागा आता समाजमाध्यमाने घेतली. आदर्श आचारसंहिता लागू होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर ‘आमचाच नेता आमदार होणार’, अशी टॅगलाइन सुरू केली आहे. गावागावात चहा स्टॉल, बस स्टॉप, केश कर्तनालय अशा ठिकाणी चर्चेला उधाण आले आहेत. निवडणुकांच्या काळात पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, चौक सभा यांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही. तथापि, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांतून विधानसभेच्या उमेदवारांचे समर्थक पोस्ट टाकले जात आहेत. समाजमाध्यम म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारदूतच बनला आहे. दिवसरात्र समाजमाध्यमांवर सक्रिय राहत हे प्रचारदूत आपल्या नेत्याचा प्रचार डोळ्यांत तेल घालून करीत आहेत.

कार्यकर्त्याला दुय्यम वागणूकीची भावना
काही वर्षांपूर्वी विरोधी गटातील लोकांशी दोन हात करणार्‍या कार्यकर्त्यांना चांगली किंमत होती. नेत्यांची मर्जी राखण्यासाठी गर्दी जमविण्यापासून पोस्टर चिकटवण्यापर्यंत हरतर्‍हेचे काम करत होते. पण, आता सोशल हँडलर्स नेत्याला समाज माध्यमांवर अ‍ॅक्टिव्ह ठेवत आहेत. तो नेत्याला आणि कार्यकर्त्यांना सल्ला देण्याचे काम करत असतो. यामुळे नेत्यांकडून त्यांना विशेष किंमत दिली जात असल्याने कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी काम करणार्‍यांमध्ये दोन गट पडले आहेत.
Exit mobile version