तरुण, युवक, युवतींमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्हयामध्ये लोकसंख्येनुसार 1 लाख 6 हजार 686 नवमतदारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. परंतु 24 हजार 318 मतदारांची नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे. या आकडेवारीनुसार नवमतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविदयालयातील युवक व युवतींमध्ये जनजागृती सुरु केली आहे. महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लबच्यामार्फत नवमतदार वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
मतदार नोंदणी अभियान, मतदार पुनरिक्षण कार्यक्रम, विशेष अभियान राबवून मतदारांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत केला जात आहे. उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, स्तरावर अनेक कार्यक्रम घेऊन मतदार नोंदणीसाठी प्रचार व प्रसार केला आहे. रायगड जिल्हयामध्ये 23 लाख 745 मतदार आहेत. 18 ते 19 वयोगटातील मतदार 10 हजार 737 तर 20 ते 29 वयोगटातील 4 लाख 7 हजार 225 मतदार आहेत. शासनाच्या सर्व्हेनुसार जिल्हयातील 1 लाख नव मतदारांनी मतदान नोंदणी करणे अपेक्षीत आहे. म्हणजे सुमारे 80 टक्के मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे. मात्र नव मतदारांकडून नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. नवमतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हयातील महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती म्हणून या क्लबद्वारे जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हयात 378 निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले. या क्लबमार्फत महाविद्यालयातील विदयार्थी प्रतिनिधी, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांद्वारे 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी शिबीर घेतले जात आहेत. महाविद्यालयातील प्राचार्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे नव मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर सहा वाटप करण्यात आला आहे. तसेच, केंद्र मतदार नोंदणी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावोगावी जाऊन नव मतदारांची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. महाविदयालयांमध्ये शिबीर राबवून नव मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. या क्लबद्वारे नव मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, निवडणूक साक्षरता क्लब 2019पासून सुरु करण्यात आला आहे. या क्लबद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून मतदान नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. वेगवेगळे शिबीर घेऊन नोंदणीचा प्रचार व प्रसार करून नवमतदार वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी