| नेरळ | प्रतिनिधी |
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असून, कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रियेची सर्व तयारी निवडणूक यंत्रणा यांनी पूर्ण केली आहे. उद्या तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर मतदान होणार असून, 1 लाख 70 हजार हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी सर्व साहित्य मतदान केंद्रांवर पोहचले असून, आज पोलीस मैदान येथे सर्व साहित्याचे वितरण करण्यात आले.
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा गट असून, त्या गटांमधील कर्जत पंचायत समितीच्या 12 गण यांच्यासाठी उद्या शनिवार दि.7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट हे मतदान यंत्र तसेच अन्य साहित्य यांचे वितरण कर्जत प्रशासकीय भवन येथील पोलीस मैदान येथे झाले. तालुक्यात 220 मतदान केंद्र असून त्या सर्व ठिकाणी आवश्यक असलेले मतदान साहित्य यांचं वितरण निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली वितरित करण्यात आले. त्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. धनंजय जाधव आणि तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. 220 मतदान केंद्रासाठी मतदान केंद्र अध्यक्ष, तीन सहायक आणि एक शिपाई तसेच एक सुरक्षा रक्षक यांना ही साहित्य वितरित करण्यात आले. हे साहित्य मतदान केंद्र येथे सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी 30 बसेस, 9 एसटी गाड्या, 20 जीप गाड्या, 29 झोनल अधिकारी वाहने, तसेच सेक्टर अधिकारी यांची 20 वाहने तैनात असणार आहेत. साधारण 1400 अधिकारी कर्मचारी वर्ग या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
तगडा पोलीस बंदोबस्त
500 होमगार्ड आणि कर्जत- नेरळ- माथेरान येथील पोलीस ठाणे यांचे अधिकारी कर्मचारी हे मतदान काळात कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी पाहणार आहेत.
