| आगरदांडा | प्रतिनिधी |
ग्रामपंचायत निवडणुकीत 32 सदस्यपदांकरिता 71, तर 4 सरपंचपदाकरिता 13 सरपंच उमेदवारांसाठी उद्या 18 डिसेंबरला निवडणूक होत आहे. यासाठी मतदान अधिकार्यांसह पोलीस शिपाई मिळून 72 तसेच 12 राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोच करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून साहित्य वितरण करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी, नायब तहसीलदार रवींद्र सानप, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, सुग्रीव वाघ, प्रतिक पावसकर, सुभाष वाणी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींकरिता निवडणुका जाहीर झाल्या होत्या.त्यामधील तेलवडे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर चार ग्रामपंचायतींकरिता 12 मतदान केंद्रांवर निवडणूक होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट व अन्य साहित्य शनिवारी निवडणूक कर्मचार्यांना घेऊन रवाना झाले आहे. त्यासाठी चार टेबलवरुन साहित्याचे वाटत करण्यात आले. त्याच पद्धतीने उद्या मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सायंकाळी त्याच चार टेबलावर मतदान झालेल्या मशीन व साहित्य पुन्हा ताब्यात घेणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.