कर्जत-खालापूर बाजार समित्यांची निवडणूक स्थगित

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील बाजार समितीच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र मतदार याद्या 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या नसल्याने आता निवडणूक कार्यक्रम एक महिना स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, 6 जानेवारी रोजी नवीन कार्यक्रम जाहीर होणार असून त्यानंतर तालुक्यातील बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

कर्जत- खालापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकार प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आला होता. मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी हा 7 डिसेंबर ठेवण्यात आला असताना यादीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु होऊनही जुन्याच ग्रामपंचायत सदस्यांची यादी अंतिम करण्यात आली होती. त्यामुळे नव्याने ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश या यादीत करण्यात यावा व त्यानंतर कर्जत खालापूरमधील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यात यावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यासंदर्भात 22 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत 6 जानेवारीपर्यंत कर्जत खालापूर कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने या मागणीला मोठे यश आले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात नवीन ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्या संदर्भात करण्यात आलेली मागणी यशस्वी ठरल्यानंतर कर्जत खालापूर तालुक्यातील नव्याने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील ग्रामपंचायत सदस्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका 6 जानेवारीपर्यंत लांबणीवर घेण्यात आलेल्या आहेत.

Exit mobile version