जेएनपीटीत कामगार ट्रस्टी पदासाठी 2 ऑगस्टला निवडणूक; 4 संघटना मैदानात

। उरण । प्रतिनिधी ।
जेएनपीटीच्या दोन कामगार ट्रस्टीपदासाठी 2 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय कामगार उपायुक्तांनी झालेल्या बैठकीनंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा केली.

जेएनपीटी ट्रस्टीची एकूण संख्या 11 आहे. दोन ट्रस्टींची निवड कामगारांच्या गुप्त मतदानाच्या माध्यमातून घेण्यात येते. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड केली जाते. मागील निवडणुकीत जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील आणि न्हावा-शेवा बंदर (अंतर्गत) संघटनेचे भूषण पाटील हे दोन कामगार ट्रस्टी अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवून ट्रस्टीपदी विराजमान झाले होते. जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस रवींद्र पाटील मागील ट्रस्टींच्या निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर गेले होते. त्यामुळे ही संघटना जेएनपीटीच्या मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या यादीतूनही बाहेर गेली.

जेएनपीटी कामगार ट्रस्टीची निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत बंदरातील सर्वच कामगार संघटना होत्या, तर विविध कामगार संघटनेने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली होती. कामगारांना आकर्षित करण्यासाठी विविध कामगार संघटनांकडून शक्ती प्रदर्शन, आंदोलन करण्यात आली. आता 2 ऑगस्ट रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच कामगार संघटना अधिकृत प्रचाराला लागल्या आहेत. यामध्ये एकूण 4 संघटना निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये जेएनपीटी कामगार एकटा संघटना, न्हावा शेवा बंदर (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन व शांती पटेल यांचा समावेश आहे.

Exit mobile version