। पनवेल । वार्ताहर ।
सोमवारी (दि.13) मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. या मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 1 हजार 958 बॅलेट युनिट, 750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट लागणार आहेत.
पनवेलमध्ये 5 लाख 91 हजार 398 मतदार आहेत. त्यामध्ये 3 लाख 17 हजार 96 पुरुष, 2 लाख 74 हजार 231 महिला तर 71 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच, पनवेल मतदारसंघात 544 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 404 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी 46 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. कर्मचार्यांना वाहतुकीसाठी 86 एसटी बसेस, 15 मिनी बसेस, 20 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर अशा 125 वाहनांची याठिकाणी आवश्यकता असणार आहे. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणार्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणार्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणार्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच, संवेदनशील मतदान केंद्रांवर 83 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान यंत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले गेले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.