कर्जतमध्ये निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

। नेरळ । प्रतिनिधी ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात 13 मे रोजी होणार्‍या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या तयारीची अंतिम पाहणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांत अधिकारी अजित नैराळे यांनी केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 5 हजार मतदार आहेत. त्यात एक लाख 53 हजार मतदार हे पुरुष तर एक लाख 51 हजार महिला मतदार आहेत. मतदारसंघात संपूर्ण कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट तसेच, खोपोली नगरपरिषद आणि खालापूर नगरपंचायतीचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 339 मतदार केंद्र असून मूळ मतदार केंद्रांची संख्या ही 335 आहे. तर, 1200पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर सर्व मतदारांना वेळेत मतदान करता यावे यासाठी चार मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. त्यात कर्जत तालुक्यात दोन ठिकाणी दुर्गम मतदान केंद्र असून तुंगी आणि ढाक या ठिकाणी ही केंद्र असणार आहेत. तर, कळकराई आणि पेठ येथील मतदान केंद्र येथील मतदारांच्या परवानगीने दुर्गम भागातून खाली पायथ्याशी आणली आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे निवडणूक प्रशिक्षण हे कर्जत जवळील शेळके मंगल कार्यालयात पार पडले.

तगडा पोलीस बंदोबस्त…
या निवडणुकीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात कर्जत तालुक्यात असलेल्या 235 मतदान केंद्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मतदान केंद्रासाठी 121 पोलीस तसेच 113 होमगार्डांच्या मदतीला बीएसएफ जवानांच्या एका तुकडीचा बंदोबस्त असणार आहे. तर, नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील मतदान केंद्र तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी 83 पोलीस कर्मचारी 86 होमगार्ड आणि बीएसएफ जवानांची एक तुकडी तैनात असणार आहे.
Exit mobile version