पाच वाजेपर्यंत 61.01 मतदान; नव, महिला, ज्येष्ठ मतदारांची अलोट गर्दी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील केंद्रामध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 61.01 टक्के मतदान झाले. 18 ते 19 वर्षांवरील, 85 वर्षांवरील तसेच दिव्यांग मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये महिलादेखील मागे नसल्याचे दिसून आले. काही मोजक्याच मतदान केंद्रात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या. त्यामुळे मतदान उशिरा सुरु झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला.
अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. काही मतदारसंघात अल्प, तर काही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या कालावधीत 7.55 टक्के मतदान झाले. अलिबाग मतदारसंघात 8.7 टक्के, पेणमध्ये 9 टक्के, महाडमध्ये 6.35 टक्के, पनवेलमध्ये 7.35 टक्के, उरणमध्ये 8.1 टक्के, श्रीवर्धनमध्ये 7.03 टक्के, आणि कर्जतमध्ये 6.5 टक्के मतदान झाले. या मतदारसंघामध्ये पेण, त्याखालोखाल अलिबाग, उरण, पनवेल मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढू लागला. तरुण मतदारांसह महिला, ज्येष्ठ व दिव्यांग मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान करण्यासाठी घरातून बाहेर पडले. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यंत 20.40 टक्के मतदान झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 19.45 टक्के मतदान, पनवेलमध्ये 16.89 टक्के मतदान, पेणमध्ये 18.9 टक्के मतदान, कर्जतमध्ये 20.1 टक्के मतदान, श्रीवर्धनमध्ये 18.22 टक्के मतदान, उरणमध्ये 29.26 टक्के मतदान, महाडमध्ये 22.67 टक्के मतदान झाले आहे. चार तासांच्या कालावधीत उरण, महाड, कर्जत, अलिबाग या मतदारसंघात सर्वात अधिक आणि पनवेल मतदारसंघात कमी मतदान झाल्याची माहिती आकडेवारीनुसार देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 34.84 टक्के मतदान झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 40.86 टक्के, पनवेलमध्ये टक्के 30.56 टक्के, पेणमध्ये 32.01 टक्के, कर्जतमध्ये 36.6 टक्के, श्रीवर्धनमध्ये 33.26 टक्के, उरणमध्ये 37.79 टक्के, तर महाडमध्ये 37.04 टक्के मतदान झाले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये अलिबाग, उरण, महाड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान झाले.
दुपारी तीन वाजेपर्यंत 48 टक्के मतदान झाले. अलिबागमध्ये 53 टक्के, पनवेलमध्ये 41 टक्के, उरणमध्ये 51 टक्के, कर्जतमध्ये 55 टक्के, श्रीवर्धनमध्ये 45 टक्के, पेणमध्ये 48 टक्के आणि महाडमध्ये 47 टक्के मतदान झाले. त्यामध्ये कर्जत, अलिबाग, उरण या मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून, पनवेल, पेण, श्रीवर्धन, महाड या मतदारसंघात 41 टक्क्यांपासून 48 टक्केपर्यंत मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात 61.01 टक्के मतदान झाले. अलिबागमध्ये 67.6 टक्के, पनवेलमध्ये 52.09 टक्के, कर्जतमध्ये 65.08 टक्के, उरणमध्ये 66.84 टक्के, पेणमध्ये 61.08 टक्के, श्रीवर्धनमध्ये 57.72 टक्के आणि महाडमध्ये 64.04 टक्के मतदान झाले.
नेतेमंडळींनी बजावला हक्क
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, अॅड. गौतम पाटील, संदीप शिवलकर, अश्विनी पाटील, अनिल चोपडा, संजना कीर, तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पिंट्या ठाकूर, काँग्रेसचे समीर ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नागावच्या सरपंच हर्षदा हर्षदा मयेकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, निखील मयेकर वेगवेगळ्या भागातील महाविकास आघाडी व शेकापचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच विविध संस्था संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुणांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील एक ते दोन ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनमध्ये बिघाड झाला. परंतु, मतदारांना जास्त वेळ न थांबवता पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यातील साधारणतः वीसहून अधिक मशीन बदल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
सखी, दिव्यांग केंद्रामुळेे उत्सवाचे वातावरण
मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते. परंतु, अलिबागमधील नगरपरिषद शाळेच्या मतदान केंद्रात सखी, दिव्यांग, हिरवे तसेच नवमतदार केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रामध्ये फुगेे व वेगवेगळी सजावट केल्याने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात सेल्फी पाईंट उभे केले होते. त्यामुळे मतदान करून अनेकांनी मोबाईलवर फोटो काढून सेल्फीचा आनंद घेतला.
वैद्यकीय किटची सुविधा
जिल्ह्यात सध्या थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यात दुपारी कडक ऊन लागत आहे. मतदानासाठी येणार्या मतदारांच्या आरोग्यासाठी जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून वैद्यकीय किटची व्यवस्था करण्यात आली. आशा वर्कर, आरोग्य सेविका व इतर आरोग्य कर्मचारी मतदान केंद्रात होते. वैद्यकीय कक्षाची उभारणी या केंद्रामध्ये करण्यात आली होती.
मंडपाअभावी मतदार उन्हात
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदान बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रात पार पडले. मतदारांची गैरसोय होऊ नये, त्यांना सुविधा उपलब्ध करण्यात यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना केली होती. परंतु, अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांबाहेर मंडप उभारले नसल्याने अनेक मतदारांना उन्हातच रांगेत उभे राहावे लागले. मागील निवडणुकीत उभारण्यात आलेल्या मंडपाचे पैसे न दिल्याने यावेळी मंडपवाल्यांनी ते बांधण्यास नकार दिला. त्याचा नाहक त्रास मतदारांना झाला. जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे पालन करण्यास अलिबागचे उपविभागीय अधिकारी अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले.
पोलिसांचा कडेकोट पहारा
मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रात पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. होमगार्ड, आरएसपी विद्यार्थी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्यांनीदेखील त्यामध्ये योगदान दिले. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणालाही विनाकारण फिरकू दिले नाही. मतदान केंद्रापासून काही अंतरावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांग, रुग्ण व ज्येष्ठ नागरिक यांना घेऊन जाणार्या वाहनांना मतदान केंद्रांपर्यंत प्रवेश देण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Related