शिक्षकांना निवडणुकीचे काम?

विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

| रायगड | प्रतिनिधी |

शैक्षणिक वर्ष 2025- 2026 हे निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याची युद्धपातळीवर तयारी सुरु झाली आहे. एकीकडे शाळा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घमासान प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहे.

निवडणूक म्हटले कि शिक्षक डोळ्यासमोर येतात. यामुळे या निवडणुकीच्या कामासाठीदेखील पुन्हा एकदा शिक्षकांची पाठवणी करण्यात येणार आहे. निवडणूक कामासाठी शिक्षकांना नेमण्यात येणार असल्याने शाळेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर निश्चित परिणाम जाणवेल. निवडणूक कामासाठी शिक्षक उपस्थित असतील परंतु, शैक्षणिक कामकाजासाठी शिक्षक अनुपस्थित राहिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या हद्दीतील प्रभागांची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाने सर्व पालिकांना दिल्यानंतर निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. लवकरच मतदारयाद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या संपूर्ण कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग लागणार आहे. या निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींची निवडणूक लागणार आहे. यामुळे शिक्षकांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत प्रशासन आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 16 जूनपासून सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव, शालेय नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याबाबत विशेष प्रयत्न, शालेय वस्तूंचे वाटप इत्यादी महत्त्वाची कामे नियोजित करण्यात येतात. वर्षभराचे शैक्षणिक अभ्यासक्रमांची, सुट्ट्यांचे, विविध शालोपयोगी उपक्रमांचे नियोजन आणि त्याची सुसूत्रतेमध्ये बांधणी करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. परंतु, सध्या शिक्षकांची निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्याचे फर्मान निघाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. परिणामी, शाळेत शिक्षक अनुपस्थित राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे. जेणेकरून शाळेतील अध्यापन, शैक्षणिक उपक्रम सुरळीत पार पडतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ते मतदानाच्या दिवशी कर्मचारी असा कर्मचारी वर्ग लागण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी, अन्य शासकीय प्राधिकरणातील कर्मचारी मिळून हा कर्मचारी वर्ग घेतला जातो. मात्र आता पावसाळ्याचे दिवस असून आरोग्य, रस्ते, घनकचरा, पर्जन्य जलवाहिन्या या विभागांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे या विभागांतील कर्मचारी न घेता शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने घेतले जाणार असल्याचे समजते.

Exit mobile version