लोकसभेनंतरच्या निवडणुका लक्ष्य

आता उमेदवारांच्या प्रचारात इच्छुकांची गर्दी

। सुयोग आंग्रे । रायगड ।

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खरे, पण उमेदवारांच्या प्रचारासाठी झटणार्‍यांमध्ये आगामी काळातील विधानसभा व पुढच्या वर्षी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांसाठी इच्छुक असलेले चेहरे दिसत आहेत. लोकसभेनंतर आठ महिन्यांत दोन मोठ्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची गर्दी प्रचारात उतरली आहे.

इंडिया आघाडीकडून रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, महायुतीकडून सुनील तटकरे तर मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपला नेता निवडून आल्यास निश्‍चितपणे त्यांच्या राजकीय वरदहस्ताने आपल्यालाही पुढे राजकारणात कोठेतरी संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना आहे. जवळपास सव्वादोन वर्षांपासून जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह काही नगरपालिका, नगरपरिषदांवर प्रशासकराज आहे. साधारणत: मार्च 2022 पासून त्याठिकाणी निवडणुका न झाल्याने आता इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे.

राज्यातील राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ झाल्याने इच्छुकांना मोठी संधी वाटू लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारापेक्षा सुद्धा हे भावी नगरसेवक, सदस्यच प्रचारासाठी पुढे पुढे करीत असल्याची स्थिती आहे. दुसरीकडे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होईल. त्यावेळी पक्षाकडून आपलेच नाव जाहीर होईल, यादृष्टीने वेगवेगळ्या पक्षातील अनेक भावी आमदार देखील प्रचारात मागे नाहीत. पण, त्यांना आताच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळला जाणार की पुन्हा एकदा चॉकलेटच ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जानेवारी-फेब्रुवारीत निवडणुका
सध्या सुरू असलेली लोकसभेची निवडणूक 4 जूनला मतमोजणी झाल्यानंतर संपेल. त्यानंतर तीन महिन्यानंतर लगेचच विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. 2019 ची विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबरला झाली होती. त्यामुळे यंदा आपल्या निश्‍चितपणे आमदारकीची संधी मिळणार म्हणून तर काहीजण उमेदवारांचा मतदारसंघ आपल्याला मिळेल या आशेने जोरदार प्रचार करीत आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणूक झाल्यावर अडीच- तीन महिन्यानंतर म्हणजेच जानेवारी- फेब्रुवारी 2025 मध्ये जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीनंतर साधारणत: आठ- नऊ महिन्यांत दोन मोठ्या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांनी आतापासूनच नेत्यांच्या पुढे पुढे करायला सुरवात केली आहे. त्याचे चित्र लोकसभेच्या प्रचारावेळी पाहायला मिळत आहे.
Exit mobile version