| नेरळ | वार्ताहर |
लोकसभा निवडणूक वर्षाच्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना दोन टर्म खासदार असलेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा प्रतिस्पर्धी काही ठरत नाही. महाविकास आघाडी कडून कोण लढणार याबाबत अद्याप कोणतीही तयारी तिन्ही पक्षांकडून सुरु असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध माधवी जोशी असा सामना सांगण्याची शक्यता आहे.
सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे लोकसभा भवन मधील कार्य आणि मतदारसंघात दगडा जनसंर्पक यामुळे त्यांना शिवसेनेकडून पुन्हा तिसऱ्यांदा उतरवले जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणुकीला सामोरे गेलेले अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मागील सव्वा चार वर्षात मतदारसंघात कुठेही दिसले नाहीत. त्यातही पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड सारख्या भागातील नागरी समस्या प्रश्नांनावर कधी आंदोलन करताना मोर्चा काढताना दिसून आले नाहीत. उरण, कर्जत आणि पनवेल मतदारसंघात भेटी देण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आणि आता देखील मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचे जाणे येणे राहिले नव्हते.आता अजित पवार भाजप शिवसेना यांच्या सरकार मध्ये सामील झालेले असल्याने श्रीरंग बारणे यांच्यासमोर प्रबळ दावेदार म्हणून पार्थ पवार हे उमेदवार असतील अशी राजकीय स्थिती सहा महिन्यात अजिबात निर्माण करू शकणार नाहीत.
कदाचित मावळ लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे कारण सोलापूर मधील शरद पवार यांचे कट्टर समर्थक यांची कन्या माधवी जोशी या मावळ मधून लढण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांचे राजकारण भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकते आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्याची मुलगी असलेल्या माधवी जोशी यांना मतदारसंघात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत राहायला ग्रीन सिग्नल तर दिला नाही ना? असा प्रश्न समोर आला आहे.
राज्यातील प्रत्येक मतदारसंघात महाविकास कडून उमेदवारांना कमला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात कदाचित माधवी नरेश जोशी यांना शरद पवार यांच्याकडून कामाला लागण्याच्या सूचना तर नाहीत ना? असे देखील बोलले जात आहे. या मतदारसंघात अद्याप कधीही महिला उमेदवार निवडणूक लढली नाही आणि त्यामुळे महिला नवीन चेहरा म्हणून जोशी यांच्या उमेदवार बद्दल गुप्तता पाळली असेल, असे देखील राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्याचवेळी अजित पवार यांची शपथ आणि नंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील शरद पवार यांच्या शक्तिप्रदर्शन व पाठिंबा देण्याच्या वेळी माधवी नरेश जोशी या हजर होत्या. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात जोशी या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर श्रीरंग बारणे यांच्यासमोर आव्हान उभे करणार, असे भाकीत वर्तवले जात आहे.