रायगडातील सहा नगरपंचायतींच्या 24 जागांच्या निवडणूका स्थगित

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या प्रत्येकी 4 नुसार एकुण 24 ओबीसी प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित) या सहा नगरपंचायतींचा यात समावेश आहे. यापैकी प्रत्येक नगरपंचायतीमधील 4 प्रभाग या नुसार एकुण 24 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव असनू त्यानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या प्रत्येकी 4 नुसार एकुण 24 ओबीसी प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर इतर 13 जागांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानुसार आता 6 नगरपंचायतीमध्ये 78 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम सुरु असून 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे. मुदत संपलेल्या 6 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. तर मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

Exit mobile version