| म्हसळा | प्रतिनिधी |
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत 11 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका, तर तीन ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार तहसिलदार कार्यालयामार्फत 30 मार्च 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 7 ते 13 एप्रिलदरम्यान राहील, तर 14 एप्रिल रोजी छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल असून, 17 एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
आवश्यकतेनुसार मतदान प्रक्रिया 28 एप्रिल रोजी पार पडेल, तर मतमोजणी व निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. अंतिम अधिसूचना 6 मे 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मांदाटणे, तुरुंबाडी, आंबेत, मेंदडी, रोहिणी, कोळे, खामगाव, खारगाव खुर्द, खारगाव बुद्रुक, गोंडघर आणि चिखलप या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर केल्टे, पाभरे आणि लिपणीवावे येथे पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमुळे म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका
