इलेक्ट्रिक बसचा एसटीला फटका

| रायगड | प्रतिनिधी |

एसटी महामंडळाने 5150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून सदर कंपनीला गाड्यांचे नवीन वेळापत्रक देऊनही अजूनही अपेक्षित बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या नसून सद्या एसटीला प्रति किलो मीटरला सरासरी अंदाजे 28 ते 30 रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. तोट्याच्या खाईत लोटणारा हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात आला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.

श्रीरंग बरगे म्हणाले की, मूळ करारा प्रमाणे सदर कंपनी भाडे तत्वावर दर महिन्याला 215 बसेस देणार होती. पण वेळेत बसेस पुरविण्यात आल्या नाहीत. तोडगा म्हणून महामंडळाने सरकारच्या मध्यस्थीने कंत्राटदार कंपनीला नवीन वेळापत्रक ठरवून दिले. तरीही कंपनीने एसटीला बसेस दिल्या नाहीत. वारंवार एसटीची फसवणूक करणाऱ्या कंपनी सोबतचा करार रद्द का करण्यात आला नाही. एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली आहे. असा सवालही बरगे यांनी उपस्थित केला आहे.

नवीन वेळा पत्रकाप्रमाणे सदर कंपनीने एसटीला एकूण मे 2026 पर्यंत एकूण 1288 बसेस उपलब्ध करून देणे गरजेचे असताना आता पर्यंत 9 मीटरच्या 260 व 12 मीटरच्या 478 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण फक्त 738 बसेस देण्यात आल्या असून दर महिन्याला 150 बसेस उपलब्ध करून देण्याचे कबूल करूनही जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात सदर कंपनीने एसटीला एकही बस उपलब्ध करून दिली नसून महामंडळाने वारंवार पत्रे लिहूनही सदर कंपनी संपर्क साधत नसून या प्रकल्पामुळे तोटा वाढत चालल्याने महामंडळाच्या चिंतेत भर पडत आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेला तोटा पहिला तर प्रकल्प पूर्ण होई पर्यंतचा संभाव्य तोटा 3200 रुपयांवर जाणार असून त्याचा होणारा व्यवहार्यता पूरक निधी सरकारने तात्काळ उपलब्ध करून दिला नाहीतर व परिस्थती अशीच राहिली तर महामंडळ आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडेल अशी भीतीही बरगे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version