सुट्टीतही सरकारी कार्यालयात विजेची होळी

श्रीवर्धनमध्ये ‌‘वीज बचवा’चा संदेश कागदावरच; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उधळपट्टी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

शासनाकडून ‌‘वीज वाचवा’ मोहिमेद्वारे जनजागृती केली जात असताना, प्रत्यक्षात सरकारी कार्यालयातच विजेचा उघड अपव्यय होत असल्याचे चित्र श्रीवर्धनमध्ये समोर आले आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सलग चार दिवस शासकीय सुट्टी असल्याने कामकाज पूर्णपणे बंद होते. मात्र, तरीही कार्यालय परिसरातील बाहेरील दिवे दिवस-रात्र सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या कालावधीत कार्यालयात कोणतेही प्रशासकीय काम सुरू नव्हते. तरीही मुख्य प्रवेशद्वार, आवार तसेच इमारतीच्या बाहेरील भागातील विद्युत दिवे चोवीस तास सुरूच ठेवण्यात आले होते. सलग चार दिवस कोणीही हे दिवे बंद करण्याची तसदी न घेतल्याने मोठ्या प्रमाणावर विजेचा अपव्यय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

स्थानिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे देणारे प्रशासन स्वतः मात्र नियम पाळताना दिसत नाही,” अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या वीजदरांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयातील हा निष्काळजीपणा अधिकच गंभीर मानला जात आहे.
या घटनेमुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ऊर्जा बचतीबाबत स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. करदात्यांच्या पैशांतून चालणाऱ्या कार्यालयातच असा उघड अपव्यय होत असल्याने जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ‌‘वीज बचत’चा संदेश केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version