वारंवार तक्रारीनंतरही महावितरणचे दुर्लक्ष
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील दांड आदिवासीवाडी येथील लोखंडी विद्युत खांब खालच्या बाजूस गंजून त्याला होल पडले आहे. त्यामुळे तो कधीही कोसळू शकतो. वारंवार हा धोकादायक खांब बदलण्याची मागणी करूनही वीज महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
मागील आठवड्यात सुधागड तालुक्यातील भार्जेवाडी येथील असाच गंजलेला व जीर्ण झालेला विद्युत खांब पहाटे कोसळला होता. सुदैवाने तेथे उपस्थित एक माणूस बचावला. यामुळे विजेच्या तारादेखील तुटल्या होत्या. दरम्यान, गावाचा वीजपुरवठासुद्धा खंडित झाला होता. अशीच अवस्था दांड आदिवासीवाडीची होऊ नये यासाठी येथील ग्रामस्थ धोकादायक विद्युत खांब वेळीच बदलण्याची मागणी करत आहेत.
याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयाकडे तक्रार केली आहे. अद्याप कोणतीच दखल घेण्यात आली नाही. हा विद्युत खांब पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
शंकर पवार, ग्रामस्थ