इलेक्ट्रिक स्कूटरला आग

वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर धावत्या इलेक्ट्रिक स्कूटरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भररस्त्यात स्कूटरला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ नागरिक आणि वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली. घटनास्थळी इतर वाहनचालकांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

यावेळी बीट मार्शल क्रमांक 2 च्या कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज येळे आणि महिला पोलीस शिपाई पूनम कसबे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणी आणि अग्निशमन यंत्राचा वापर करत स्कूटरला लागलेली आग आटोक्यात आणली. तसेच संबंधित स्कूटरचालकाला आवश्यक ती मदत केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आग अधिक पसरण्याचा संभाव्य धोका टळण्यास मदत झाली. या घटनेत वाहतूक पोलिसांनी दाखविलेली समयसूचकता, प्रसंगावधान आणि कर्तव्यतत्परता विशेष कौतुकास्पद ठरली. भर वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेत पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत परिस्थिती हाताळल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला. घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि संबंधित स्कूटरचालकाने येळे व कसबे यांचे आभार मानत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. वाहतूक पोलिसांची जबाबदारी केवळ वाहतुकीचे नियमन करण्यापुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संकटाच्या क्षणी प्रसंगावधान राखून नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या युवराज येळे आणि पूनम कसबे यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय दिला. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे वाहतूक पोलिसांविषयी नागरिकांचा आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Exit mobile version