जिल्ह्यातील एक लाखाहून अधिकांचा वीजपुरवठा खंडित
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये एक लाखांहून अधिक वीज बिल थकबाकीदार आहेत. यामध्ये सरकारी कार्यालयांपासून कारखानदार व व्यापार्यांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. 99 कोटी 90 लाख 85 हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. थकबाकीदारांना वीजपुरवठा खंडित करण्याचा शॉक महावितरणकडून दिला जात आहे. आतापर्यंत चार हजार 952 जणांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये महावितरणचे जाळे पसरले आहे. व्यावसायिक, व्यापारी, कारखाने, सरकारी कार्यालयांमध्येदेखील वीजपुरवठा केला जात आहे. दर महिन्याच्या तीन तारखेला महावितरण कंपनीचे कर्मचारी मीटरची रिडींग घेऊन वीज वापरावरून बिल देतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वीज बिल भरण्याचे आवाहन केले जाते. परंतु, काहीजण बिल भरत नाहीत. जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत वीज बिल थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महावितरण कंपनी कामाला लागली आहे. जिल्ह्यात वेगवेगळी पथकं तयार करून थकीतदारांकडून वसुलीचे काम केले जात आहे. रायगड जिल्ह्यात 99 कोटींहून अधिक रुपयांचे वीज बिल थकित आहे. एक लाखांहून अधिक ग्राहकांनी वीज बिल थकविले आहे. त्यामध्ये एक हजार 844 सरकारी कार्यालयांकडून 93 लाख 93 हजार रुपये, 381 कारखान्यांकडून 44 लाख 68 हजार रुपये, सात हजार 528 व्यापार्यांकडून दोन कोटी 68 लाख रुपये, तसेच गावांमधील दोन हजार 877 पथदिव्यांचे 87 कोटी 12 लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचे कर्मचारी थकीतदारांकडून वीज बिल वसूल करण्यात मग्न आहेत. बिल थकविणार्यांविरोधात कडक कारवाईदेखील या कर्मचार्यांकडून केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार 952 जणांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यात घरगुतीपासून अनेक ग्राहकांकडून वीज बिल थकित आहे. वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ग्राहकांनी वीज बिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलानी यांनी केले आहे.
थकबाकीदारांवर दृष्टिक्षेप वर्गवारी - ग्राहक - रक्कम (रुपये) व्यापारी - 7528 - 2 कोटी 68 लाख औद्योगिक - 381 - 44 लाख 68 हजार पथदिवे - 2877 - 87 कोटी 12 लाख सरकारी कार्यालये - 1844 - 93 लाख 93 हजार एकूण - 1 लाख 784 - 99 कोटी 90 लाख 85 हजार
घरगुती आठ कोटींचे बिल थकले महावितरण कंपनीकडून वैयक्तिक तथा घरगुती बिल थकविणार्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. पाचशे रुपयांपासून बिल थकलेले असले, तरीदेखील त्यांच्याकडून वसूल केले जात आहे. 88 हजार 154 ग्राहकांकडून 8 कोटी 70 लाख रुपयांचे बिल थकले आहे. ते वसूल करण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जात आहे.