जिल्हा परिषदेच्या 1180 शाळांचे वीज बिल थकीत

महावितरणचा शाळांना शॉक
723 शाळांची वीज कायमस्वरूपी खंडित
457 शाळांची वीज तात्पुरत्या स्वरूपात बंद

। पेण । संतोष पाटील ।
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे 1180 शाळांनी विजेचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करुन महावितरणने शाळांना शॉक दिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 723 शाळांची वीज ही कायमस्वरूपी खंडित करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या शाळा भरण्यासाठी सादिल अनुदान दिले जाते. यामध्ये जिल्हा परिषद शाळांना लागू होणारे दर हे घरगुती वर्गवारीतील दरापेक्षा कमी असून, प्राथमिक शाळांना सार्वजनिक सेवा वर्गवारी अंतर्गत वीज आकारणी केली जाते. परंतु, रायगड जिल्ह्यातील शाळांची सुमारे 50 लाख रुपयांच्या विजेच्या बिलाची थकबाकी असल्याने या शाळांची वीज खंडित करण्यात आली होती.
त्यातच, राज्य विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज खंडित करण्यासंदर्भात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार, रायगड जिल्ह्यातील तब्बल 1549 शाळांची वीज खंडित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या 679 शाळांची बिलाची थकबाकी अनेक वर्षांपासून असल्याने त्यांची वीज कायमस्वरूपी खंडित करण्यात आली होती.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महावितरण कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील जानेवारी 2022 पर्यंत सुमारे 1180 शाळांची वीज खंडित करण्यात आली आहे. तर, यापैकी 723 शाळांची वीज ही कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. तर, 457 शाळांची वीज तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. जिल्हा परिषद शाळांनी वीज देयके वेळेवर भरणे ही शाळांची जबाबदारी असल्याने वीज बिल भरण्यात दिरंगाई केल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामध्ये, अलिबाग विभागीय हद्दीतील (पेण-अलिबाग) 160, गोरेगाव विभाग (माणगाव, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड) 271, पनवेल विभाग (पनवेल, खालापूर, खोपोली, कर्जत) 186 आणि रोहा विभाग (रोहा, मुरूड, म्हसळा, तळा) 116 जिल्हा परिषद शाळांचे कायमस्वरुपी वीज खंडित करण्यात आली आहे. दरम्यान, शाळेची वीज खंडित करण्यात आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला विजेचा शॉक लागला आहे.

अधिकार्‍यांची टोलवाटोलवी
रायगड जिल्ह्यातील 1180 शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय, याबाबत चौकशीसाठी अधिकार्‍यांना फोन केला असता, याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कोणतीच माहिती नसल्याची बाब समोर आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आपल्या जबाबदारीपासून दूर असल्याचे समोर येत आहे. जे अधिकारी कायदा आणि कर्तव्याच्या डिंगा मारतात, त्यांना जिल्ह्यातील शाळांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती नाही, ही बाब खूपच चिंताजनक आहे. पेण तालुक्याचा विचार करता जवळपास 115 शाळा वीजपुरवठा खंडित असताना, येथील गट शिक्षणाधिकार्‍यांना काहीच माहीत नसल्याचे समोर आले आहे. एकंदारीत काय तर, अधिकारी वर्गांची मुले प्रायव्हेट शाळांमध्ये शिकत असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे दुःख यांना काय समजेल?

आमच्याकडे अशी कोणतीच माहिती नाही. परंतु, दोन-तीन दिवसांत याबाबत योग्य ती माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. – ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, रायगड जि.प.

Exit mobile version