महावितरण विभागाच्या अजब कारभार; वीजग्राहकाला फटका
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महावितरणच्या अजब कारभाराचा फटका कळंबोली वसाहतीमधील एका वीजग्राहकाला बसला आहे. केवळ 142 युनिट वापरलेली असताना 255 युनिट वीज वापरली असल्याचे देयक वसाहतीत राहणार्या सुनील दुबे यांना महावितरण विभागाकडून पाठवण्यात आले आहे. छपाईत झालेल्या चुकीमुळे हे देयक पाठवण्यात आले असल्याचे हास्यास्पद उत्तर दुबे यांना महावितरण विभागाच्या कर्मचार्यांकडून देण्यात आले आहे.
महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसतो. सुनील दुबे यांनादेखील याचा प्रत्यय आला आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत आलेल्या दुबे यांना महावितरण विभागाकडून दर महिना एक हजार ते दीड हजार वीजदेयक पाठवले जात असते. रेफ्रिजरेटर, एक पंखा आणि दोन बल्बसाठी वीज वापरल्याने हे देयक पाठवले जाते. ऑक्टोबर महिन्यात मात्र दर महिन्यापेक्षा दुप्पट म्हणजे 2 हजार 935 रुपये इतकी रक्कम देयकापोटी आल्याने जादाचे देयक का आले हे तपासण्यासाठी गेलेल्या दुबे यांना आपल्या मीटरचे सध्याचे चालू रिडींग 16 हजार 471 इतके असताना देयकावर मात्र 16 हजार 538 इतके रिडींग छापले असल्याचे लक्षात आले.
जादाचे देयक पाठवण्यात आल्याने दुबे यांनी जवळील महावितरण विभागाशी संपर्क केला. यावेळी आपल्या देयकाविषयी माहिती घेतली असता महावितरणच्या कर्मचार्यांनी ज्या वेळी दुबे यांच्या मीटरचे रिडींग घेतले, त्यावेळी ते केवळ 16 हजार 425 इतकेच होते. दुबे यांना तेवढेच बिल येणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता 113 युनिट जास्त वीज वापरल्याचे देयक दुबे यांना महावितरणकडून पाठवण्यात आले आहे.
महिन्याच्या 2 तारखेला घेतली जाते रिडींग
ग्राहकांच्या वीज मीटरची रिडींग महिन्याच्या सुरुवातीला घेतली जाते. महावितरणकडून याकरिता खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. या एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन मीटर आणि मीटरवर आलेल्या रिडींगचा फोटो काढून तो महावितरण विभागाकडे पाठवतात. फोटोतील माहितीवरून महावितरण विभाग ग्राहकाला वीज देयक आकारतात.