वीज कंत्राटी कामगार संघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

| उरण | वार्ताहर |

महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांवर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कर्मचार्‍यांचे न्याय व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे सोमवारी (दि.28) पासून कामगार उपायुक्त रायगड, खांदा कॉलनी, नवी मुंबई यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती वीज कंत्राटी कामगार संघाचे रायगड जिल्हा सचिव कमाल खान यांनी दिली.

वीज वितरणाच्या सर्कल वाशी अंतर्गत एकूण 512 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात 40,000 हुन अधिक कंत्राटी वीज कर्मचारी कार्यरत आहेत. वाशी सर्कल मधील कर्मचार्‍यांकडून विजेचे काम करून घेण्याचे कंत्राट ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा. लि., कुसुम मसाला जवळ, गोरेगाव (पूर्व) या एजेन्सीला (कंपनीला) देण्यात आले. ही कंपनी कंत्राटी वीज कर्मचार्‍यांचे पगार करत असते. या एजन्सी (कंपनी) च्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. पण गेली अनेक वर्षापासून सदर एजन्सी (कंपनी) कंत्राटी कामगारावर वेगवेगळे अन्याय करत आहेत.

सदर अन्यायाबाबत कंत्राटी कामगारांनी लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र सर्व समस्या आहे तशाच आहेत. कंत्राटी कामगारांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नसल्याने कंत्राटी कामगारांनी शेवटी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात सर्व कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष – उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार यांनी केले आहे.

Exit mobile version