उरण पूर्व विभागातील वीज समस्या लवकरच सुटणार

दिघोडे येथे सबस्टेशनसाठी महावितरणकडे जागा हस्तांतरित

। उरण। वार्ताहर ।

महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पूर्व विभागात विजेचा सातत्याने खेळ खंडोबा सुरू असतो. रात्री अपरात्री, कधी कधी दिवसभर या भागात वीज खंडीत होते, त्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून आत्ता पुर्व भागातील जनतेची सुटका होणार आहे. दिघोडे येथे नवीन सवस्टेशन होणार असून या करता शासनातर्फे जागा महावितरणला भाडेपट्टीने देण्यात आली असून त्या बाबतचे डिपॉझिट शासनाकडे महावितरणने नुकतेच भरण्यात आले आहे.

केंद्र शासन पुरस्कृत आरडीएसएस योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या नवीन उपकेंद्र उभारण्याकरीता दिघोडे येथिल स.न. 166/6क या शासकीय जमिनीपैकी 10 गुंठे जमिन हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच येथे महावितरणकडून वीज केंद्राचे काम सुरू होवून उरण पूर्व भागातील विजेची समस्या दुर होईल. दिघोडे येथे उपकेंद्र होण्यासाठी माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी कित्येक वर्षे पाठपुरावा केला होता त्यांच्यामुळेच हे उपकेंद्र मंजूर होण्यापासून ते जागा मिळणे या बाबी मार्गी लागल्या आहेत. उरण तालुक्यातील पूर्व भाग विकसित होत चालला आहे विविध कंपन्याची गोदामे वसली आहेत. विजेचा वापरात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजेचा वापर वाढत असताना मात्र सर्व सामान्य जनतेची दररोजची वीज गायब होऊ लागली आहे.

कोणत्याना कोणत्या भागामध्ये विजेचे फॉल्ट असल्याचे कारण पुढे करत वीज गायब होते. पावसाळा सुरू झाल्यापासून हा नित्य नियम सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तिन्ही वेळेत वीज गायब होते आहे. याचा अर्थ अधिकार्यांचे विजेच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसुन येत आहे. याचा सर्वाधिक फटका उरण तालुक्याच्या पूर्व विभागाला बसत आहे. उरण पूर्व भागात येणारी वीज ही सुमार 70 ते 75 किलोमिटर लांबीवर असलेल्या फिडरवरून आणली जाते त्यात ही संपूर्ण वीज लाईन ही रस्त्यांच्या कडेकडेने आलेली आहे. या रस्त्यांवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्यामुळे रोज कुठेतरी एकतरी वाहन या विजेच्या खांबाना धडकल्यामुळे वीज खंडीत होते. त्याच प्रमाणे उरण पुर्व भागात या वीजवाहिन्यांच्या खाली सर्वत्र भराव झाल्यामुळे वीज वाहिन्या जमिनी लगत खाली आल्या आहेत. एखादे वाहन किंवा काहीतरी अपघात होऊन या वीज वाहिन्या तुटल्या जातात. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होतो.

उरण तालुक्यातील मागील दोन वर्षात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रचंड प्रमाणे वाढणारे औद्योगीकरण व शहरी करण यामुळे विजेची मागणी वाढली आहे. तालुक्यात सुमारे 700ते 800 हे व्यावसायिक प्रकारचे ग्राहक आहेत. तालुक्यात सुमारे 500 च्या जवळपास ट्रान्सफॉर्मर आहेत . उरण पूर्व विभागात सुमारे 70ते 75 किलोमीटर लांबून वीज आणावी लागते. त्यामुळे इथंपर्यंत येताना वीज वाहिनीमध्ये काहीतरी समस्या येऊन रोज वीज खंडीत होते. यासाठी हे अंतर कमी करणे गरजेचे आहे. यासाठी उरण पूर्व भागात सबस्टेशन आणि फिडर उभारणे गरजेचे होते.

उरण पुर्व भागासाठी दिघोडे येथे 10 गुंठे जागा मिळाली असून त्याचे शासनाकडे डिपॉझिट भरले आहे. लवकर या कामाचे टेंडर होवून सबस्टेशनच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

विजय सोनावणे,
अति. कार्यकारी अभियंता
महावितरण उरण
Exit mobile version