सणासुदीला देखील विजेचा लपंडाव

रोहा | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाचा सण जवळ आला आहे पण जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधींच्या रोहा तालुक्यातील विजेचा लपंडाव मात्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. वीज महामंडळाचे अधिकारी मात्र बिलाच्या वसुलीत मश्गुल असे चित्र रोहा शहर व संपूर्ण ग्रामीण भागात दिसून येत आहे.कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे.गणपती कारखानदार मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यासाठी धडपड करत आहेत.पण शहर व तालुक्यातील विजेचा लपंडाव त्यांच्या कामात व्यत्यय आणत आहे.विजेच्या लपंडावामुळे मिठाई व्यावसायिकांना घेतलेल्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या याची विवंचना पडली आहे.गणपती उत्सवात डेकोरेशनच्या वस्तुंना मोठी मागणी असते.विजेच्या माळा,तोरणे,फिरती चक्रे अशा विविध वस्तूंची खरेदी विक्री विजेच्या लपंडावामुळे रोडावली आहे.विजेच्या लपंडावाचा परिणाम पिठाच्या चक्क्यांवर देखील झाला असून मोदक तयार करण्यासाठी आवश्यक पीठ तयार करून देण्यासाठी घाई झाली आहे. जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी रोहा तालुक्याला लाभले असून देखील तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Exit mobile version