केळाचा माळ प्रकाशमय

। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील केळाचा माळ या आदिवासीवाडीत राहणारे आदिवासी बांधव गेली अनेक वर्ष तात्पुरत्या जोडलेल्या विद्युत वाहिनीच्या प्रकाशाच्या आधारावर राहत होते. तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच झाडांचा आधार घेत जोडलेल्या या वीज वाहिन्या वादळ वार्‍यामुळे वारंवार तुटून पडत होत्या. प्रकाशाची किरणे आपल्या आदिवासीवाडीत येण्यासाठी या आदिवासी बांधवांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी देखील केल्या. परंतु या आदिवासी बांधवांकडे कोणीही लक्ष दिले नाही.

आदिवासी बांधव अंधारात राहत आहेत, विद्युत वाहिन्या जोडलेल्या आहेत; पण प्रकाश किरणांचा पत्ता नाही. अशी अवस्था असताना सचिन घबाडी, राजेंद्र भगत, किरण कुंभार यांच्या पुढाकाराने आणि शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी व मनसे या महाआघाडीचे समविचारी कार्यकर्ते राजीपचे सदस्य बाजीराव परदेशी, पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील, संतोष चिर्लेकर, पद्माकर फोफेरकर, अलंकार परदेशी, कशोर भगत, शितल घबाडी व सविता केणी तसेच अन्य सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केळाचा माळ येथील आदिवासीवाडीवर विद्युत पोल टाकून या विद्युतीकरण होऊन येथील आदिवासी वाडी आता प्रकाशाने उजळली आहे. यासाठी महावितरण कंपनीचे चिरनेर अभियंता खाटीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version