नऊ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

थकबाकी दोनशे कोटींच्या घरात; वसुलीला वेग

| रायगड | प्रतिनिधी |

थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. (दि.13) मार्चपर्यंत कल्याण परिमंडलात सुमारे 9 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी व नियमानुसार जीएसटीसह पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून संभाव्य गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या कल्याण परिमंडलातील 3 लाख 20 हजार 301 ग्राहकांकडे 191 कोटी 11 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत 50 हजार 514 ग्राहकांकडे 28 कोटी 3 लाख रुपयांची थकबाकी असून 1 हजार 191 थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित केला आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत 96 हजार 948 ग्राहकांकडे 68 कोटी 61 लाख रुपयांचे वीजबिल थकित असून 3 हजार 633 जणांची वीज खंडित केली आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील 1 लाख 10 हजार 239 ग्राहकांकडे 50 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी असून 3 हजार 397 जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तर पालघर मंडलातील 62 हजार 600 ग्राहकांकडे 44 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे व 574 जणांची वीज खंडित करण्यात आली आहे.

वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी रविवार आणि इतर सुट्टींच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version