| मुंबई | प्रतिनिधी |
भांडूप परिमंडलातील विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांकडे रु. 479.12 कोटीची थकबाकी आहे. वीजबिल भरण्यासाठी महावितरणतर्फे कृषी ग्राहकांसाठी तसेच कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी योजना जाहीर केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा व आपले थकीत व चालू वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. भांडूप परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांकडे वीज देयकाची पूर्वीची थकबाकी व चालू वीजबिल मिळून एकूण रु. 479.12 कोटी आहे. यामध्ये उच्चदाब ग्राहकांची थकबाकी व चालू वीजबिल मिळून रु. 79.71 कोटी असून लघुदाब ग्राहकांची थकबाकी व चालू वीजबिल मिळून रु. 399.41 कोटी आहे. यामध्ये, घरगुती ग्राहकांची – 86.34 कोटी , व्यावसायिक – 76.16 कोटी, औद्योगिक- 55.65 कोटी, पाणीपुरवठा योजनांचे – 6.30 कोटी , स्ट्रीट लाईट – 164.25 कोटी, इतर ग्राहकांची 8.38 कोटी तर कृषीपंप ग्राहकांचे- 2.34 कोटी थकीत आहे. महावितरणतर्फे कृषीग्राहक वगळता, इतर सर्व वर्गवारीतील वीजबिल वसुलीसोबतच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम राज्यभर सुरु आहे. वाढत्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. ते दूर करण्यासाठी वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करावेत. महावितरणने नियमित चांगली व तत्पर सेवा ग्राहकांना दिली आहे. जर ग्राहकांनी नियमितपणे आपले वीज बिल भरले तरच भविष्यात सुद्धा चांगली व सक्षम सेवा देणे महावितरणला शक्य होईल असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.