महावितरणची कारवाई
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत येथे मध्य रेल्वेच्या पनवेल मार्गिकेचे काम सुरू आहे.त्या कामातील कर्जत भागात नवीन पुलाचे काम केले जात आहे.या पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेली वीज ठेकेदार काम करणारी ठेकेदाराने चोरून वापरली आहे. त्याबद्दल महावितरण कंपनीला माहिती मिळताच धड टाकण्यात आली,पण महावितरण कंपनीकडून किरकोळ कारवाई करून ठेकेदार कंपनीला सोडून देण्यात आले.
कर्जत रेल्वे स्टेशन जवळच असणार्या किरवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पुलाचीवाडी परिसरात येणार्या व रेल्वे पटरीच्या पलीकडील हद्दीत रेल्वे लोको शेड रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. याठिकाणी कामगारांना रहाण्यासाठी शेड देखील ठेकेदाराने बांधून दिले आहेत.येथे काम चालू असताना विजेचा वापर प्रामुख्याने गरजेचा असताना ठेकेदाराने वीज कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा रितसर कागदपत्रे देऊन मीटर न घेता बेकायदेशीरपणे आकडा टाकून वायर घेऊन वीज चोरी केली जात होती. येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वीज कंपनी कार्यालय कर्जत येथे तक्रार केली. कोरोना काळात वीज बिल भरले नाही म्हणून सर्वसामान्य ग्राहकांना घराची वीज विनाविलंब तोडणारे,आकडा टाकला,मीटरमध्ये फेरफार केल्यास वीज चोरी प्रकरणी नियमानुसार सर्वसामान्य नागरिकाला हजारोंचा दंड ठोकणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजचोर ठेकेदाराला पाठीशी का घालत आहेत ? असा सवाल आता या प्रकरणात उपस्थित झाला असून हे प्रकरण वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके, अभियंता डफळ आणि या विभागात काम करणारे वायरमन यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.






