। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मानिवली गावातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन जबरदस्ती करून बलात्कार करण्यात आला. मागील दीड महिन्यात तीन ते चार वेळा अतिप्रसंग करण्यात आल्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी कल्याण येथे रुग्णालयात उपचार घेत आहे. उपचार घेत असताना फिर्यादी अल्पवयीन मुलीने कल्याण येथे तक्रार दिल्यानंतर तेथून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. मुलीच्या घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन त्याच गावातील 37 वर्षीय तरुण त्या मुलीच्या घरी जायचा आणि जबरदस्तीने त्या मुलीवर अतिप्रसंग करायचा. कल्याण येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सदर प्रकाराची नोंद कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्या तरुणीची फिर्याद नेरळ पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आल्यानंतर नेरळ पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी सदर मुलगी अल्पवयीन असल्याने त्या 37 वर्षीय तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा देखील नोंद झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.