| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड उप विभाग कर्मचारी यांनी एक विशेष पथक तयार करून नांदगाव विभागातील वीज चोरी पकडण्यासाठी प्रयत्न करीत असताना वीजचोरी करणाऱ्या ग्राहकास पकडले असता संबंधित त्याच्या लोकांनी महावितरण कर्मचारी यांना तुमचे हातपाय तोडून टाकेन, जीवे ठार मारण्याची धमकी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी नांदगाव येथील एक अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुरुड महावितरणमधील नांदगाव विभागाचे कनिष्ठ अभियंता कासिम शेख, कोकबान शाखा अभियंता संदेश होंडे, आगरदांडा शाखा अभियंता मनोज देशमुख, महिला कर्मचारी गौरी राठोड हे सर्व कर्मचारी नांदगाव विभागातील सुरुळपेठ, खरीकवाडा व अन्य भागात फिरून वीजचोरी पकडत होते. यासाठी ते घरामध्ये असणारे मीटर तपासात होते. त्यांनी नांदगाव परिसरात एका वीज मीटरची तपासणी केली असता त्यांना तिथे वीजचोरी लक्षात आली. तेव्हा त्यांनी ते वीज मीटर काढून घेतले व त्या घरातील वीज वापर कसा आहे याचा तपास सुरू केला. परंतु, झालेला प्रकार वीजचोरी करणाऱ्या व्यक्तीस न आवडल्याने त्यांनी दमदाटी करून ते मीटर पुन्हा बसवण्यात भाग पाडले. तसेच सर्व कर्मचारी यांना दमदाटी व जिवेठार मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी मुरुड महावितरण विभागाने मुरुड पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुरुड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी सांगितले की, नांदगाव भागातून तीन लोकांच्या वीजचोरी पकडण्यात आले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. कर्मचारी यांना दमदाटी करणे हे प्रकार अयोग्य असून, त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे.







