44 लाखांची वीज चोरी उघड

। कल्याण । प्रतिनिधी ।

महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरू आहे. उपविभागातील सर्वाधिक गळती असलेल्या वीज वाहिनीवर गेल्या दीड महिन्यात केलेल्या तपासणीत 184 जणांकडे 44 लाख रुपयांची वीजचोरी आढळली. या सर्व 184 जणांविरूद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या दीड महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत टिटवाळा मंदिर, बल्याणी, बनेली, मांडा पश्‍चिम भागात 134 तर गोवेली शाखेंतर्गत म्हारळ व वरप भागात 50 जणांकडे वीजचोर्‍या आढळून आल्या. यात वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या 40 ग्राहकांचा समावेश आहे. टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे आणि त्यांच्या टिमने ही कामगिरी केली.

Exit mobile version