एप्रिलपासून वीज महागणार

अडीच रुपयांनी होणार वाढ

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात 1 एप्रिलपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (दि.31) विजांच्या दरनिश्‍चितीबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे मार्चअखेर ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्‍चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. शुक्रवारी (दि.31) वीज नियामक आयोग याबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे राज्यात वीजदरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटण्याची शक्यता आहे. राज्यात नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नियामक वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी आयोग आपला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महावितरण, ग्राहक संघटनेचे वेगवेगळे दावे
महावितरणने 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी 67 हजार कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या विजेच्या दरात प्रतियुनिट अडीच रुपयांची वाढ होणार असल्याचा दावा ग्राहक संघटनांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने केवळ एक रुपया दरवाढ होईल, असे सांगितले आहे.

असे वाढणार प्रतियुनिट दर
महावितरणने इंधन समायोजन आकारासह 25 टक्के दरवाढीची मागणी करणारा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. घरगुती ग्राहकांसाठी सध्या इंधन समायोजन आकारसह विजेचा दर प्रतियुनिट 7.79 रुपये आकारला जातो. वीज नियामक आयोगाने महावितरणचा प्रस्ताव मान्य केल्यास विजेचा दर 2023-24 मध्ये 8.90 रुपये, तर 2024-25 मध्ये 9.92 रुपये होणार आहे. म्हणजेच, विजेचे दर प्रतियुनिट अनुक्रमे 1.11 रुपये आणि 2.13 रुपयांनी वाढणार आहेत, तर वीज शुल्काचा भार पकडून ही वाढ 2.55 रुपयांपर्यंत होणार असल्याचा दावा राज्य वीज ग्राहक संघटेनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे.

अदानी, टाटाचीही वीज महागणार
अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023-24 या वर्षासाठी 2 ते 7 टक्के, तर टाटा पॉवरने 10 ते 30 टक्के एवढ्या दरवाढीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कंपन्यांनी 2024-25 या वर्षात मात्र वीज दरात कपातीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर वीज आयोगाने फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन जनसुनावणी घेत ग्राहकांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यानुसार दरवाढीबाबत आवश्यक असलेले सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.31) सर्व वीज कंपन्यांच्या वीजदर निश्‍चितीचे आदेश येतील.

Exit mobile version