नागाव येथील अतुल गुरवची कलाकृती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कल्पवृक्ष समजल्या जाणार्या नारळाच्या झाडापासून अनेक गोष्टी मिळत असतात. याच नारळाच्या करवंटीपासून देखील अनेक कलाकृती कलाकार निर्माण करीत असतात. त्यात आणखी भर टाकली आहे ती अलिबाग तालुक्यातील नागाव येथील अतुल गुरव याने. अतुलने नारळाच्या करवंटीपासून अनेक प्रकारच्या शोभिवंत राख्या तयार केल्या आहेत. अतुलची ही कलाकृती पर्यावरणपुरक आणि तितकीच आकर्षित ठरत असल्याने साहजिकच तिला मागणी देखील चांगल्या प्रकारे येत आहे.

नागाव येथे राहत असलेल्या अतुल हेमंत गुरव याला टाकाऊतून टिकाऊ बनवण्याचा छंद आहे. म्हणजेच त्याला जी टाकाऊ वस्तू मिळेल त्याचा तो त्याच्या कल्पकतेने वापर करून छानपैकी टिकाऊ अश्या वस्तू बनवतो. या अश्या टीकाऊ, शोभीवंत वस्तूंची वाढू लागल्याने त्याच्या छंदाचे हळू हळू व्यवसायात रूपांतर झाले. गेली आठ-नऊ वर्षे हा त्याला छंद असून गेली 6-7 वर्षांपासून हा त्याचा व्यवसायच बनला आहे. नारळाच्या करवंटीपासून अतुल छान – छान शोभीवंत वस्तू बनवतो.

गेल्यावर्षी अतुलने बांबूच्या राख्या बघितल्या. त्यावर त्याच्या लक्षात आले कि आपणही नारळाच्या करवंटीपासून राखी बनवू शकतो. प्रयोगासाठी म्हणून त्याने सुरवातीला वेगवेगळ्या डिजाईनच्या थोडया राखी बनवल्या. त्या त्याने आपल्या मित्रपरिवाराला दाखवल्या. समाज माध्यमांवर अपलोड केले. त्याला सगळ्यांचा छान प्रतिसाद मिळाला. एक हजारपेक्षा जास्त राखी अतुलने बनवल्या आणि विकल्या देखील. हे माझ्यासाठी फारच अविश्वासनीय होत. याकरता आपणा प्रियजणांची साथही तेवढीच महत्वाची होती. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी ही मी वेगवेगळ्या डिजाईन मध्ये राखी बनवल्या आहेत. यावर्षीही मला छान प्रतिसाद मिळत असल्याचे अतुल गुरवने कृषीवलजवळ सांगितले. राख्यांच्या ऑर्डर साठी संपर्क 9764344192/ 9130175696 येथे संपर्क साधावा.