पेढा खाल्ल्याने अकरा महिलांना विषबाधा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

शृंगारतळी येथील घटना

| गुहागर | प्रतिनिधी |

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरीमधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या 11 महिलांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

शृंगारतळी येथील ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागे एका इमारतीत वेदांत ज्वेलरीचे मालक बळीराम साळवी रा. मळण यांनी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुंबईहून ज्वेलरीचे मटेरियल आणून काम देत होते. श्रावण महिना असल्याने एका महिलेने सकाळी 11 च्या सुमारास अय्यंगार बेकरी येथून पेढे आणले व त्यातील अर्धा-अर्धा पेढा महिलांना दिला. काही वेळाने येथील महिलांना चक्कर व उलटी होण्यास सुरुवात झाली. त्वरित यांना प्रो लाईट हॉस्पिटल शृंगारतळी येथे दाखल करण्यात आले.

यामध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी, व मानसी शिगवण या महिलांचा समावेश असून सर्व महिला तळवली मळण पालपेणेमधील राहणाऱ्या आहेत.

यावेळी आरोग्य विभागाच्या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वाडकर यांनी त्वरित भेट दिली. तर गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या टीमने येऊन पंचनामा केला. शृंगारतळीत अनेक बेकऱ्या असून या बेकऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. अन्न व प्रशासन विभाग याकडे डोळेझाक का करते? असा प्रश्न आता जनतेतून केला जात आहे. दरम्यान, सध्या सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version