ई-रिक्षासाठी एल्गार

माथेरानकरांचा अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
| नेरळ | प्रतिनिधी |
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माथेरानमध्ये तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर ई- रिक्षा चालविण्यात आली. हा पायलट प्रकल्प संपवल्यावर ई-रिक्षा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्या सुरू व्हाव्यात आणि माथेरानमधील बंद पडलेल्या रस्त्यांची कामे पुन्हा सुरु करावी, या मागणीसाठी शुक्रवार, दि. 17 मार्च रोजी माथेरान पर्यावरण संवेदनशील मंच यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

माथेरानमधील पर्यावरणपूरक ई-रिक्षा पुन्हा सुरू व्हावी आणि क्ले पेव्हर ब्लॉकचे बंद केलेले रस्ते पुन्हा सुरु व्हावेत या प्रमुख मागणीसाठी पर्यावरण संवेदनशील नागरिक मंचच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माथेरानमधील श्रीराम चौकातून निघालेल्या मोर्चामध्ये माथेरानमधील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह श्रमिक रिक्षा संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, मानव कल्याण दिव्यांग सामाजिक संघटना, माथेरान व्यापारी फेडरेशन, निसर्ग पर्यटन पॉईंट संघटना, क्षत्रिय मराठा समाज, कोकावासीय समाज, माथेरान बौद्ध महासभा, माथेरान चर्मकार समाज, माथेरान मुस्लिम समाज, माथेरान वाल्मिक समाज, माथेरान बोहरा समाज, माथेरान गुजराती समाज यांच्यासह बालगोपाल भजन मंडळ, वन ट्री हिल मंडळ, रग्बी मंडळ या संघटनांचा मोर्चाला पाठिंबा होता. श्रीराम चौकातून निघालेला मोर्चा महात्मा गांधी रस्त्याने अधीक्षक कार्यालय येथे पोहोचला. या मोर्चात शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच माथेरानमधील स्थानिक व महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर चालणार्‍या ई रिक्षा यापुढे ही सुरू राहाव्यात, अशी प्रमुख मागणी या मोर्चात केली होती. दुपारी बारा वाजता मोर्चाने अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. शिष्टमंडळाने अधीक्षक तथा तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी माथेरान नगरपरिषदेच्या प्राशासक सुरेखा भणगे, पोलीस अधिकारी शिकार लव्हे यांची उपस्थिती होती. तर माथेरान पर्यावरण संवेदनशील मंचकडून शकील पटेल, सुनील शिंदे, राजेश चौधरी, प्रवीण सकपाळ, योगेश जाधव, प्रदीप घावरे, प्रकाश सुतार तसेच माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नागरध्यक्ष प्रेरणा सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, संतोष कदम, वर्षा शिंदे, दत्तात्रय संगारे, श्रीराम मढवे, नासिर शारवन, अनिल गायकवाड, संदीप कदम हे पाठिंबा देणारे पदाधिकारी तसेच त्या त्या संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

पर्यावरण संवेदनशिल नागरिक मंचने मागणी सनियंत्रण समितीचे सचिव तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि लवकरात लवकर टिस या संस्थेने केलेला अहवाल राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करावा. यावर उपाय म्हणून क्ले पेव्हर ब्लॉकचा पर्याय सनियंत्रण समितीच्या मान्यतेने बसविण्यात आले होते. त्यामुळे ई रिक्षा लवकर सुरू व्हावी व क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे ही आमची प्रमुख मागणी आहे.तर यावेळी माथेरान अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपण ई रिक्षा बद्दल निघालेला मोर्चा याबाबत रायगड जिल्हाधिकारी यांना तात्काळ कळविणार असून, त्यावेळी मोर्चेकर्‍यांच्या सर्व मागण्यांबाबत माहिती वरिष्ठ कार्यालयाला देणार आहोत, असे सर्वांसमोर स्पष्ट केले.

Exit mobile version