स्थानिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये तीन महिने प्रायोगिक तत्वावर चालविली जाणारी ई-रिक्षा बंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा ती सेवा सुरू व्हावी यासाठी माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरम कडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून ही लढाई जिंकण्यासाठी माथेरानकर लोकवर्गणी काढू लागला आहे.
माथेरानकरांमधून ई-रिक्षा कायम सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. त्यात ई-रिक्षा कायम स्वरुपी चालविण्यास विरोध आणि माथेरानमध्ये सुरू असलेले क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सदर याचिका सर्वोच्य न्यायालयाने दाखल करून घेतली असून माथेरान शहरात सुरू असलेली पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉकची कामे दोन महिन्यासाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
या निर्णयाविरुद्ध माथेरान मध्ये जनमत तयार होत असून माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरम स्थापन करण्यात आला आहे. या फोरमच्या माध्यमातून सर्वोच्य न्यायालयात दाखल झालेली याचिकेला सामोरे जाण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि ग्रामस्थांच पाठिंबा मिळविण्यासाठी हा फोरम काम करीत आहेत. सर्वोच्य न्यायालयात सदर लढाई लढण्यासाठी या फोरमच्या माध्यमातून चांगला वकील देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी माथेरान मधील नागरिक, वेगवेगळे व्यावसायिक तसेच सामाजिक संस्था यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी आर्थिक मदत जाहीर केली असून या फोरमच्या माध्यमातून राज्य सरकारला साकडे घालून राज्य सरकारने याचिकेसाठी वकील द्यावा, असा प्रयत्न सुरू आहे.
ई-रिक्षा कायम स्वरुपी सुरू रहावी यासाठी माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरमला आता पर्यंत जेष्ठ नागरिक संघ, चर्मकार समाज, श्रमिक रिक्षा संघटना, धोबी समाज, कोकण मराठा समाज, मानव कल्याण सामाजिक संस्था, गुजराथी समाज, बाळ गोपाळ भजन मंडळ, माथेरान व्यापारी फेडरेशन, बाळ राधिका भजन मंडळ, आदिवासी तालुका मोर्चा, अंजुमन स्कूल यांच्यासह राजकीय पक्षांमध्ये शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, शेकाप, आरपीआय आठवले गट यांनी पाठिंबा दिला आहे. तर आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे.