कोयना प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

पावसाळी अधिवेशनावर लाँग मार्चने धडकण्याचा इशारा

| रसायनी | वार्ताहर |

64 वर्षे झाली तरीही कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या न्याय मागण्या पूर्ण होत नसल्याने अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाने 28 जून रोजी तालुक्याच्या ठिकाणी तर 2 जुलै 2024 रोजी लाँग मार्चने पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा धडकणार असल्याची माहिती अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली. कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला सातारा जिल्ह्यातून हद्दपार होऊन 64 वर्ष झाली तरीही प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे 28 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असून हे आंदोलन कोयना प्रकल्पग्रस्त गावातील तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयावर धडकणार,तर 2 जुलै 2024 रोजी कोकणभवन येथून पावसाळी अधिवेशनात विधी मंडळावर लाँग मार्चने धडकणार आहे.

अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाची वार्षिक बैठक खालापूर तालुक्यातील धवली या पाच गावात झाली,तर दुसरी बैठक पनवेल तालुक्यातील अकल्पे या गावी रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्हयातील कोयना प्रकल्पग्रस्त गावातील प्रकल्पग्रस्त खातेदार आणि त्यांच्या वारसांची संप्पन झाली, त्यावेळी झालेल्या सभेत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली. गेली 64 वर्ष कोयना प्रकल्पग्रस्त खातेदार अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या शासकीय दरबारी मांडत आहेत. यात रास्ता रोको आंदोलन, उपोषण, धरणे,बैठक, आंदोलन करण्यात आली. वेळोवेळी आश्‍वासन देण्यापलीकडे काहीच झाले नाही, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही कोयना प्रकल्पग्रस्त आहेत.

या प्रकल्पाच्या त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. पण राज्याचे हित, देशाचा विकास हा विचार करून गरीब, अशिक्षित शेतकरी तत्कालीन राजकीय नेते यांच्या शब्दावर विश्‍वास ठेऊन आपले मुळ गाव सोडून रायगड, सातारा, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर, पालघर या जिल्ह्यात विखुरल्याने आणि दळणवळण साधन नसल्याने कायमचे विखुरले गेले, आणि त्याचाच गैरफायदा तत्कालीन प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी घेतला. आणि आजही आपल्या नागरी सुविधा, पर्यायी शेती जमीन, नोकरी, प्रकल्पग्रस्त दाखले यापासून दूर राहिले, असे संघाचे ज्येष्ठ सल्लागार पवनराव कदम यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

अन्याय किती वर्ष सहन करायचा असा विचार सर्व सामान्य प्रकल्पग्रस्त यांच्या मनात आल्याने येत्या 28 जुन 2024 रोजी कोयना प्रकल्पग्रस्त गावातील तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तर 2 जुलै रोजी कोकण भुवन नवी मुंबई येथून लाँग मार्च निघून पावसाळी अधिवेशनात विधीमंडळावर धडक देईल असे कार्याध्यक्ष अर्जुन कदम यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष आनंद सकपाळ, ज्येष्ठ नेते बळीराम शिंदे, किसन जाधव, अशोक जाधव, सदानंद भातोसे, जीतू सकपाळ, जगदीश मरागजे, मारुती देवरे, सुरेश सकपाळ यांच्यासह प्रकल्पग्रस्त खातेदार मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version