महाविकास आघाडीचा मुंबईत एल्गार

छत्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ हल्लाबोल मोर्चा
राज्यपालांना हटविण्याची मागणी; शेकापसहित डावी आघाडीही सहभागी

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभीमान, शाहू, फुले, आंबेडकरांचा सन्मान हाच आमचा अभिमान अशा घोषणांनी शनिवारी अवघी मुंबई दणाणून गेली. निमित्त होते सरकारच्याविरोधात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाचे. या मोर्चात भाजपविरोधी पक्षांनी एकजूट दाखवून एकीचे बळ दाखवून दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शेतकरी कामगार पक्षासह स्वाभिमानी पक्ष (राजू शेटृटी), समाजवादी पार्टी, आर.पी.आय.(सेक्युलर), बहुजन विकास आघाडी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, लाल निशाण पक्ष, भा.क.प-मा.ले.(लिबरेशन), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष अशा सर्व पक्ष संघटनांनी या मोर्चात आपला सहभाग नोंदवून सरकारविरोधात हल्लाबोल केला.

महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा – पवार


मोर्चासमोर बोलताना शरद पवार यांनी या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे, अशी टीका केली. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रतीक आज इथे दिसतंय. महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. अशा व्यक्तीबाबत टिंगल-टवाळी राज्यपालांकडून होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा इशाराही शरद पवारांनी आपल्या भाषणातून दिला.

महाराष्ट्राच्या इतिहासात असा गव्हर्नर कधी पाहिला नाही. मी स्वत: राज्याच्या विधानभवनात जाऊन 55 वर्षं झाली. या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम यांनी केलं. पण यावेळी राज्याच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम होत आहे. महात्मा फुले, सावित्रीबाईंबद्दल लाजिरवाणे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

या इशार्‍यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मैदानात त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, याबद्दलची खात्री मला आहे .

खा. शरद पवार
राष्ट्रवादी अध्यक्ष

महाराष्ट्र द्रोह्यांचे डोळे उघडणार -ठाकरे


मोर्चासमोर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एवढी ताकद एकवटल्यानंतर कुणाची काय ब्याद आहे की मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लचका तोडणार.असा हल्लाबोल भाजपवर केला. या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जर ते उघडणार नसतील, तर ते कधीच उघडू नयेत, अशी आपण प्रार्थना करुयात. जा, निघून जा इकडनं अशी मागणीही त्यांनी केली.

मी तर त्यांना राज्यपालच मानत नाही. त्या पदाचा आम्ही नक्की मान राखतो. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल कोण असावा? फक्त केंद्रात जो बसतो, त्यांच्याघरी काम करणारा माणूस कुठेतरी सोय म्हणून पाठवायचा नसतो. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिज,अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतये खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे.

अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीयेत.

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख

यासाठी कायदा आणा – अजित पवार


राज्यपालांना हटवलं पाहिजे. दोषी असणार्‍या आमदारांना हटवलं पाहिजे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पावलं उचलायला हवीत. त्यासाठी कायदा केला तरी चालेल, विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देतील. अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोर्चासमोर बोलताना केली.

माणसाची चूक एखाद्या वेळी होते. चूक झाल्यावर माफी मागणं ही आपली महाराष्ट्र संस्कृती आहे. मराठी माणसावर तसे संस्कार केले आहेत. पण तसं घडत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे दुसरे मंत्री बोलतायत. यांना जनाची नाही, मनाची काही वाटायला पाहिजे. तुम्ही राज्यपाल म्हणून बसलायत. पण याचा विसर राज्यकर्त्यांना पडलाय, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला, तरी महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो. मग ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे. असेही ते म्हणाले.

महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी, महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी आपण हा मोर्चा काढला आहे.

भाजपाचा खरा चेहरा समोर -पटोले


मागच्या आठवड्यात राज्यपाल पंतप्रधानांसोबत बसलेले आपण पाहिले. भाजपाचा खरा चेहरा समोर आला.अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं वक्तव्य केलं. त्यामुळे देशाच्या महापुरुषाचा अपमान करण्याचं धाडस भाजपानं केलं,असे पटोले यांनी सांगितले.

रावण गाडण्यासाठी एकत्र – राऊत


समोर दिसणारा रावण गाडण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. रणनीती ठरली आहे. शंख फुंकलं आहे. आता फक्त ही फौज युद्धासाठी सज्ज करायचयी आहे. आजचा मोर्चा सांगतो की महाराष्ट्राच्या जनतेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केलं आहे. या मोर्चानं इशारा दिलाय की शिंदे फडणवीस सरकार, तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. असा इशारा खा.संजय राऊत यांनी दिला.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शेकापचा मोर्चात सहभाग


छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्या अस्मितेची जर कुणी हेतुता अवमान करणार असेल तर त्याचा जाब विचारणे हे आमचे कर्तव्य आहे. तोच जाब विद्यमान राज्यकर्त्यांना विचारण्यासाठी शेकाप महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चात सहभागी झालेला आहे. असे शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी राज्यकर्त्यांना निक्षूण बजावले.

शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चात रायगडसहित महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हात लालबावटे घेऊन सहभागी झालेले होते. मोर्चाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी राज्यकर्त्यांवर टीकेचे आसूड ओढले. काँग्रेस, राष्ट्रवादीशी आमचे राजकीय मतभेद आहेत ते राहतील, पण महाराष्ट्राच्या अस्मितेला जर कुणी हेतुता ठेच पोहोचविणार असेल तर त्याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. यासाठीच शेकापने राजकीय मतभेद बाजुला ठेवत केवळ महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन तो यशस्वीही करुन दाखविला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

सीमा प्रश्‍नावरही त्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.हा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटावा आणि सीमावासियाना न्याय मिळावा, अशीच शेकापची प्रथमचपासूनच भूमिका राहिलेली आहे. सीमावासियांच्या मागे शेकाप आजही ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे जर सीमावासियांवर कर्नाटककडून अन्याय होणार असेल तर शेकाप तो कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वंचित मोर्चापासून दूरच
महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा निघाला होता. त्या मोर्चात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहूजन विकास आघाडी सहभागी झाली नाही. त्यावर आंबेडकर म्हणाले हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला घ्यायला मतभेद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही, आम्हाला सोबत घेण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचं नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त असं कळवले होते की, आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू मात्र अजित पवार म्हणाले की, हा प्रश्‍न अजून विचाराधीन आहे. याचा अर्थ नाही असा होतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये म्हंटलं आहे

Exit mobile version