सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध
| रसायनी | वार्ताहर |
डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारने या ठिकाणाच्या कंपन्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राज्य सरकारच्या या निर्णयाला आता पाताळगंगा गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. पाताळगंगा एमआयडीसी आणि निवासी परिसरामध्ये कोणताही बफर झोन शिल्लक राहिला नसून, याठिकाणी जर कंपन्या स्थलांतरित केल्या तर आंदोलन उभा करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटात अनेकांचा जीव गेला आणि अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचसोबत या परिसरातील हजारो घरांचे नुकसान झाले. येथील एमआयडीसीला लागून नागरी वस्ती उभी राहिल्याने अखेर केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये स्थालांतरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बफर झोन असलेल्या भागात केमिकल कंपन्या स्थलांतरित व्हाव्यात हा सरकारचा हेतू असला तरी ज्या पाताळगंगा भागात केमिकल कंपन्या नेण्यात येणार आहेत, त्या ठिकाणीसुद्धा एमआयडीसीची जागा आणि येथील गावं एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे पाताळगंगा भागात केमिकल कंपन्या स्थालांतरीत करण्यास येथील गावकरी, संघर्ष समिती आणि राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.
सरकारने गावकऱ्यांनी विश्वासात न घेता केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये आणल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेकापचे उपसभापती सुनील सोनावळे शेकापचे युवा नेते दशरथ गायकर आणि भाजपाचे पदाधिकारी विजय मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते राकेश खराडे यांनी दिला आहे. तर, बेमुदत उपोषण करून सरकारला धारेवर धरणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मारूती पाटील यांनी सांगितले. सरकारने गावकऱ्यांनी विश्वासात न घेता केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये आणल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर शेकापक्ष, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने केमिकल कंपन्या येण्यास विरोध दर्शवला आहे.
सरकार आमच्या भागात कंपन्या आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देत असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू. सरसकट केमिकल कंपन्या स्थालांतरीत करण्यास आमचा विरोध राहील. ज्या कंपन्या अतिधोकादायक आणि ज्वलनशील असतील त्यांना आमचा विरोध राहील.
माजी आमदार मनोहर भोईर
गेल्या तीन महिन्यांत येथील केमिकल कंपन्यांना अनेक वेळा आग लागली आहे. हवेत विषारी धूर सोडून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने पाताळगंगामध्ये केमिकल कंपन्या येण्यास आमचा विरोध आहे.
माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप
पाताळगंगा परिसरावर दृष्टिक्षेप येथील जमिनींची 1982 साली सरकारकडून खरेदी एकूण 3 हजार एकर जमिनीची खरेदी लहान-मोठ्या 145 कंपन्या सुरू 11 गावं, 8 ठाकूरवाड्या, 8 कातकरी वाड्या सध्या 10 ते 12 केमिकल कंपन्या कार्यरत इंजिनिअरिंग झोन असताना केमिकल कंपन्या येत आहेत. 20 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. पुढील पाच वर्षात लोकसंख्या 50 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता.