। खोपोली । वार्ताहर ।
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड व लाइफगियर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून चौक ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले गेले होते. या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेवक, कर्मचारी आणि रुग्णांनीदेखील सहभाग घेतला होता.
चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सविता कालेल यांनी पुढाकर घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशाप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते याचे प्रात्यक्षिकासह विस्तृत असे मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, लाइफगियर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज बागुल आणि सौरभ घरत यांनी केले. रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधने, आग प्रतिबंधक उपकरणे आणि साहित्य यांचा वापर कसा व कोणत्या वेळी करावा याबाबत चित्र स्वरूपात माहिती देऊन कर्मचार्यांकडून त्यांची हाताळणीदेखील करवून घेतली गेली. शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचार्यांना दिले गेले.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेले अपघात पाहता रुग्णालयातील कर्मचार्यांना अश्या प्रसंगात मदतकार्य करण्याकरता योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने आपण या शिबिरासाठी आग्रह धरल्याचे डॉ. सविता कालेल यांनी यावेळी प्रतिपादन केले. विजय भोसले, अमित गुजरे आणि चौकट ग्रामपंचायतचे सदस्य निखिल मालुसरे हेदेखील शिबिरात उपस्थित होते.