एनडीआरएफकडून आपत्कालीन प्रशिक्षण

जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम हाती

। रायगड । प्रतिनिधी ।

आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनाबाबत जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या सहभागाने विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण आज देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत भूस्सखलन, पूर परिस्थिती काळात करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार, पद्धत, रस्त्यावरील अपघात काळात करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार, वायूगळती आपत्तीवर उपाययोजना या विषयांवर प्रात्यक्षिके करण्यात आली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, एनडीआरएफ पुणे, तहसीलदार कार्यालय पनवेल व सी.के.टी. महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्तीविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पनवेल येथे आयोजित प्रशिक्षणासाठी तहसीलदार पनवेल विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार हे उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महेंद्र पुनिया-सिनीयर इन्स्पेक्टर व जालिंदर फुंदे-सिनियर इन्स्पेक्टर यांच्या पथकाकडून प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार विजय पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. आपत्ती निवारणामध्ये स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा याची माहिती दिली. आपदामित्रांनी मागील वर्षात केलेले काम सांगताना भविष्यात येणार्‍या आपत्तीमध्ये स्थानिक यंत्रणा सतर्कतेने कार्यवाही करील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत उपस्थितांचे आभार व्यक्त केले. नागरी संरक्षण दल, उरणचे श्री. म्हात्रे व त्यांचे पथक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी पनवेल व उरण तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल असे 150 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षणास सी.के.टी. महाविद्यालय प्राचार्य श्री. पाटील व एनएसएस प्रमुख आकाश पाटील यांचे सहाकार्य लाभले.

Exit mobile version