| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी प्रशासनाच्या सोबत आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाव पातळीवरील वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण मंडळी यामध्ये सहभागी झाले आहेत. अतिवृष्टीसह, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात जीवाची बाजी लावत अपदा मित्र स्वयंसेवक म्हणून विनामूल्य सेवा देत आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी स्थानिकांचा हातभार महत्वाचा असतो. निसर्ग चक्री वादळाबरोबरच तौक्ते चक्री वादळाच्या मोठ्या हानीनंतर स्थानिकांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अपदा मित्रांची निवड करण्याचा निर्णय घेतला. 18 वर्र्षंपासून 40 वर्षापर्यंतच्या मंडळींना अपदा मित्रामध्ये सामावून घेण्यात आले. या उपक्रमाला जिल्ह्यातून शेकडो तरुणांचा सहभाग मिळाला. त्यात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी सहभाग घेऊन अपदा मित्र होण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात 300 अपदा मित्रांची निवड करण्यात आली. त्यांना महाड, माणगाव, पनवेल, पेण या ठिकाणी प्रशिक्षण देऊन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याचे धडे देण्यात आले आहे. अतिवृष्टीत अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत अपदा मित्र विनामुल्य सेवा देण्याचे काम करीत आहेत. जीवाची पर्वा न करता, प्रशासनाच्या खांद्याला खांदा देत गरजूंना मदत करण्याबरोबरच आपदग्रस्तांना अधार देण्याचे काम अपदा मित्र करीत आहेत.







