जेएसएमला उदयोन्मुख महाविद्यालयाचा पुरस्कार

| अलिबाग | प्रतिनिधी |

येथील जनता शिक्षण मंडळाच्या कॉलेजच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली येथे दि. 22 एप्रिल रोजी झालेल्या Education Excellence Award- 2023 या परिषदेत जेएसएम कॉलेजला Most Emerging Higher Education Institute of the year-2023 हा शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्यलचा पुरस्कार देण्यात आला.

देशभरातील एकूण 150च्या वर शैक्षणिक संस्था व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेत प्रत्यक्ष व आभासी पध्दतीने सहभागी झाल्या होत्या. या परिषदेत डॉ. सी.के. भारद्वाज, श्रीमती फैयाज खान, डॉ. मुक्त शर्मा, डॉ. मोनालिसा हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होते. जानेवारी 2022 मध्ये जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर वर्षभरात अ‍ॅड. गौतम पाटील यांनी महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रात केलेले अमूलाग्र बदल व विकास कार्यक्रमांमुळे महाविद्यालयाची यशस्वी घौडदौड चालू आहे.

शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये नवनवीन रोजगारभिमुख अभ्यासक्रम, सर्व विभांगांमध्ये सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्स सुरू करून विद्यार्थ्यांसाठी नवीन दालने उघडून दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सांस्कृतिक, क्रीडा व इतर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. मुंबई विद्यापीठाच्या रायगड विभागाच्या सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, आंतर महाविद्यालयीन बुध्दीबळ स्पर्धांचे आयोजन, हर-घर तिरंगा, 15 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन, शिवस्वराज्य दिन कार्यक्रम, माजी विद्यार्थी मेळावा ’यादों की बारात’ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन वर्षभरात केले गेले. विद्याथ्यांसाठी क्रिकेट-नेट उपलब्ध करून दिले, जिमखाना अद्ययावत केला गेला, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धामध्ये पारितोषिके मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. महाविद्यालयात पद पथ, पिण्याच्या पाण्याची सोय, कॅन्टीन, महिला कक्ष, प्रत्येक सहशैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र कार्यालय, विद्यार्थी सुविधा केंद्र, अ‍ॅम्फी थिएटर (खुला रंगमंच) अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

वर्षभरातील महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख पाहता जेएसएम महाविद्यालय हे या पुरस्कारासाठी प्रमुख दावेदार होते व त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली. सकाळी झालेल्या एका भरगच्च कार्यक्रमात जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी आभासी पद्धतीने हा पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्कार महाविद्यालयास मिळाल्याबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दिलेल्या संपूर्ण सहकार्यामुळेच आमची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

अ‍ॅड. गौतम पाटील
अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, अलिबाग
Exit mobile version