अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणावर भर

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, एकात्मिक बाल विकास योजना आणि ईस्क्रा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड विभागातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. पोषण किट, आरोग्य निदान किट, मार्गदर्शन आदी विविध उपक्रमांचा समावेश आहे. अंगणवाडी सक्षमीकरण कार्यक्रमामध्ये सर्व प्रथम 156 अंगणवाडी सेविकांसाठी आरोग्य निदान किट याचे वाटप करण्यात आले. उपस्थित डॉक्टर यांनी या किटचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविकांची क्षमता बांधणी व्हावी या हेतूने वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन त्यांना करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुलांचे पहिले हजार दिवस, स्तनपान, आणि वॉश कार्यक्रम याचा समावेश आहे.

यावेळी सुधागड तालुक्यातील सहा वर्षाच्या आतील मुले गरोदर माता स्तनदा माता यांच्यासाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्वप्ना दाहे, बालरोगतज्ञ डॉ. लेखराज तळमळे, डॉ. प्रकाश मोटे व न्यूट्रिशनिस्ट फाल्गुनी बोरकर उपस्थित होते. सदर उपक्रमात 200 पेक्षा अधिक लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीएसआर प्रतिनिधी आदित्य सालेकर, गटविकास अधिकारी लता मोहिते, एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे, इस्क्रा संस्थेचे अध्यक्ष अर्चना पाले आणि सचिव रामचंद्र आव्हाड हे उपस्थित होते.

2500 कुटुंबांना पोषण किटचे वाटप
सुधागड तालुक्यातील स्थलांतर लक्षात घेता पौष्टिक आहाराची जागृती लोकांमध्ये व्हावी या उद्देशाने व पोषण निर्देशांक वाढावा या हेतूने सुधागड तालुक्यातील 2500 कुटुंबांना पोषण किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किट चे वितरण गरोदर माता, स्तनदा माता, सहा वर्षाच्या आतील मुले व सॅम व मॅम या कॅटेगरीतील मुले यांना करण्यात येणार असून उद्घाटन रंजना म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर संपूर्ण प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आर्थिक सहाय्य करून सुधागड मधील अंगणवाडी सेविकांना सुदृढ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच सोबत 156 वाडीतील 2500 कुटुंबांना पोषण किट वाटण्यात आले.
Exit mobile version