करंजा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

। उरण । वार्ताहर ।

उरण-करंजा या मुख्य रहादारीच्या रस्ताला सतराशे साठ खड्डे पडले असून रस्ता धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर रस्ताच शिल्लक राहणार नसल्याची खंत सचिन डाऊर यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील नागरिकांना उरण बाजारासाठी तसेच उरण ते अलिबाग जल प्रवासी प्रवाशांसाठी करंजा-उरण या मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यातच करंजा बंदराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे डाऊर नगर, मुळेखंड या ठिकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतूकीसाठी रहदारीचा मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, जिल्हा परिषद, सिडको आणि चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version