। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पाली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यावर उतारा म्हणून काही ठिकाणी नगरपंचायतीमार्फत खडी टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले होते. वाहनांची रेलचेल व सतत पडणार्या पावसामुळे येथे पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. खड्यांची लांबी, रुंदी व खोली वाढली आहे. काही ठिकाणी तर खड्यांचे तळे झाले आहे. या खड्यांमुळे नागरिक, शाळेचे विद्यार्थी, रस्त्यालगत असणारे दुकानदार, बल्लाळेश्वर दर्शनासाठी येणारे भाविक व वाहन चालकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.
अवजड वाहनांची वाहतूक, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि देखभालीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे पालीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पालीतील एस बी आय बँक ते गांधी चौक, हटाळेश्वर चौक ते बस स्थानक या वर्दळीच्या रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे खड्डे बुजविण्यात पाली नगरपंचायत अपयशी ठरल्याचे दिसत आहे. नागरिकांवर असे म्हणण्याची वेळ आली आहे की ङ्गकाय ते रस्ते, काय ते खड्डे, पालखीतील खड्डे म्हणजे समद कस ओके ओके.. अशी बोलण्याची वेळ येथील नागरीक तसेच वाहन चालक आली आहे. याबाबत पाली नगरपंचायत नगर उपाध्यक्ष आरीफ मनियार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असती ते म्हणाले की पालीतील ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत.ते लवकरात लवकर भरण्यात येतील.