| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा वसाहत येथील सेक्टर 8 मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रीडेव्हलपमेंट कामादरम्यान धक्कादायक घटना घडली. बिल्डरकडून वीज मीटरसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असताना हेवी ड्रिल मशीनचा स्पर्श भूमिगत केबलला झाल्याने एका कर्मचाऱ्याला जोरदार विजेचा धक्का बसला. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे संपूर्ण सेक्टर 8 मधील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अचानक वीज बंद झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. या कामासाठी बिल्डरने वीज वितरण विभागाकडे परवानगी अर्ज दाखल केले असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष कामावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांची उपस्थिती का नव्हती, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज वितरण विभागाने दक्षता घेऊन योग्य मार्गदर्शन करावे, तसेच नागरिकांसाठी जनजागृती शिबीर आयोजित करावे, अशीही मागणी पुढे येत आहे.
केबल कामादरम्यान कर्मचाऱ्याला शॉक
